हुपरीतील शवविच्छेदन विभाग त्वरीत सुरु करावा; अन्यथा २४ जानेवारीपासून आंदोलनाचा इशारा 

हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन गृहाचे नुतनीकरण सुरू आहे. याला कोणी वाली नसल्याने कित्येक महिन्यांपासून काम रखडले आहे अधिकारी वर्गाला याची तमा नसावी कारण शवविच्छेदनासाठी बाहेर जावे लागत असल्याने त्यांना रात्री अपरात्री आरोग्य केंद्रात उपलब्ध असण्याची गरज नाही यामुळे त्यांना चांगलीच फुरसत मिळत आहे. मात्र अपघातग्रस्त घरातील नागरिक व नातेवाईकांना मृतदेहाची अवहेलना सहन करीत तिष्ठत बसावे लागत  आहे. इचलकरंजी किंवा कोल्हापूर सीपीआरकडे धाव घ्यावी लागत असल्याने आर्थिक फटका, होणारा मनस्ताप लक्षात घेतला असता हा जनतेच्या भावनांशी खेळखंडोबा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

हुपरी पंचक्रोशीतील गावांमध्ये लोकसंख्येने जवळपास दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. रस्त्यावर वाहनांच्या लागलेल्या रांगा, प्रचंड वर्दळ पहाता नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. बऱ्याच वेळा कोणाचेच नियंत्रण नसल्याने सुरक्षित वाहतूक होताना दिसून येत नाही. यातून सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे.

मानसिक परिस्थितीत शवविच्छेदनासाठी होणारी धावपळ आता थांबायला पाहिजे व आरोग्य प्रशासनाने कायमस्वरूपी चोवीस तास डॉक्टर उपलब्ध करुन सहकार्य करावे अन्यथा २४ जानेवारीपासून रस्त्यावरची लढाई आरंभली जाईल व दिवसेंदिवस आक्रमक भूमिका घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा मनसे शेतकरी संघटना व शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे. तसे निवेदन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.