अलीकडच्या काळात बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या जीवनावर, आरोग्यावरती खूपच विपरीत परिणाम होत चाललेला आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळे आजार पसरू लागलेले आहेत. रेंदाळ शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने गांभीर्याने या साथीच्या आजाराकडे पाहणे गरजेचे आहे. दररोज कुठे ना कुठेतरी डेंग्यू अतिसार टायफाईडचे रुग सापडत आहेत. पुर्ण रेंदाळ शहराचे सर्वेक्षण करून जनजागृतीची गरज आहे.
गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. यावर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य प्रशासनाने सर्व्हे सुरू केला असून ग्रामपंचायतीने साफसफाई सह, औषध फवारणी वर भर द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. यापूर्वी याबाबत साथीच्या आजारांचे वाढते गांभीर्य आरोग्य विभागाच्या लक्षात आणून दिले होते. ग्रामपंचायतीने ही धोक्याची घंटा समजून औषध फवारणीसह गाव सर्व्हे करण्याची व जनजागृती करण्याची मागणी जाणकार लोकांमधून होत आहे. काही संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आता आरोग्य विभागाने फक्त कागदोपत्री रेकॉर्ड न करता डेंग्यू सदृश साथीचे निर्मूलन करण्यासाठी जिल्हा पातळीवरील उपाययोजना करण्याबाबत सूचना देऊन डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. नळाला आठ दिवसातून येणारे पाणी यामुळे पाण्याची साठवणूक करण्याशिवाय गत्यंतर नाही आणि हीच साठवणूक डेंग्यूच्या आळ्यांचे माहेरघर बनले आहे. मानेनगर रेंदाळ येथे डेंग्यूचे दोन रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने पाहाणी केली असता पाण्याच्या टाकीत आळ्या असल्याचे दिसून आले आहे. माध्यमांनी याबाबत आवाज उठविला की संबंधित विभागाला जाग येते ही फार मोठी शोकांतिका आहे.
खाजगी दवाखान्यात रुग्णाची प्रमाणाबाहेर सखया आहे. याची खातरजमा करणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेव्हा या डेंग्यू सदृश साथीचे निर्मूलन करण्यासाठी जिल्हा पातळीवरील आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अन्यथा साथ वणव्यासारखी पसरेल अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.