महापालिकांची रणधुमाळी कधी? आजी-माजी नगरसेवकांसह काही नवे चेहरे देखील उतरणार महापालिका निवडणुकीत…..

विधानसभेची निवडणूक पार पडली यामध्ये सत्ताधारी महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक काळात प्रभागातील निवडणुकीची तयारी करणाऱ्या माजी प्रशासक नगरसेवकांसह इच्छुकांना महापालिका निवडणुकांचे वेध लागलेले आहे. जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे लक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे लागलेले आहे. सरकार सत्तेत आरुढ होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घोषित करणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. राज्यातील बहुतांश नगरपालिका तसेच महापालिकांवर प्रशासक राज आहे.

दरम्यान, सन २०२२ मध्ये इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. यामुळे सुमारे पावणेतीन वर्षापासून महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका प्रलंबित असल्याने माजी नगरसेवकांबरोबरच स्थानिक  कार्यकत्यांमध्ये नाराजी आहे. तेव्हा बराच काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात, अशी मागणी होत आहे. महापालिकेत प्रशासक असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पालिकेतील थेट सहभाग संपुष्टात आला आहे. नगरसेवकच नसतील तर आमची कामे कशी होणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

शहरातील सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. यासाठी अनेक आजी-माजी नगरसेवकांसह काही नवे चेहरे देखील महापालिका निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने त्यांनी प्रभागातील सामाजिक कार्याबरोबरच छोट्या- मोठ्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत.  शिवसेना नेते आम. संजय शिरसाट यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये होतील असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर यासंबंधी निर्णय होईल, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.