सांगोल्यात २४ टीम द्वारे पशुगणनेस सुरुवात; डॉ. असलम सय्यद 

सन २०१७ च्या नंतर आता चालू वर्षी पशुगणनेस सुरुवात झाली आहे. मोबाइल अॅपचा वापर करून ही गणना होणार आहे. या पशुगणनेमध्ये जनावरांच्या जाती, उपजातींचीही नोंद होणार आहे. त्यामुळे ही पशुगणना आजवरची अद्ययावत आणि पशूधनाची सविस्तर माहिती संकलित करणारी पशुगणना असणार आहे. यासाठी सांगोला तालुक्यात २४ टीम तयार करण्यात आले असून, पशुपालक शेतकन्यांनी आपल्याकडील अचूक माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय विभागाकडून डॉ. असलम सय्यद यांनी केले आहे. शेतकरी, पशुपालकांकडील कौटुंबिक पशूधन, उद्योग, संस्था, संघटनांच्या वतीने पाळलेल्या गायवर्गीय, म्हसवर्गीय पशूंसह, मिथुन, मेंढी, शेळी, घोडा, शिंगरू, गाढव, उंट, कुत्रा, ससा आणि कुक्कुट पक्षी (कोंबडे – कोंबड्या, बदक, टर्की आणि इमू, क्टोल, गिनी) आदींसह सोळा प्रकारच्या प्राण्यांची मोजणी करण्यात येणार आहे. तसेच भटकी कुत्री, गटक्या गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी) यांची देखील माहिती संकलित करण्यात येईल. 

२१ व्या पशुगणनेस सुरुवात झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही पशुगणना केली जाणार आहे. शेतकन्यांनी, पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशूंची अचूक आणि योग्य माहिती द्यावी. पशुगणनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या आणि राज्यात आढळणाऱ्या पशुधनाच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. ही पशुगणना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. आपल्याकडील जनावरांची अधिकृत माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे असेही पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर असलम सय्यद यांनी सांगितले आहे.