मिरज रोडवरील भुयारी मार्गावर तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात : आम. डॉ. बाबासाहेब देशमुख 

सांगोला शहरातील मिरज रोडवरील भुयारी मार्गामधून प्रवास करत असताना सांगोला शहर व परिसरातील नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. वाहन चालकांना या पुलाखालून वाहन चालवताना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर सततच्या पाण्यामुळे येथे मोठमोठे खड्डे पडून सातत्याने दररोज छोटे-मोठे अपघात वारंवार घडत आहेत. येथील काम पूर्णपणे चांगल्या दर्जाचे झालेले नसल्याचे वारंवार नागरिकांनी, वाहनधारकांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील याकडे दुर्लक्ष होत असून संबंधीत प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे. सांगोला शहरातील मिरज रोडवरील भुयारी मार्गामधून येथून जाताना सांगोला शहर व परिसरातील नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. काल सायंकाळच्या सुमारास याच मार्गावर अपघात झालेल्या व्यक्तींने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी थेट संपर्क साधून या गंभीर प्रश्नावर आपण आवाज उठवून तात्काळ योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी केली. या मार्गावर अनेक वृध्द नागरिक, महिला, विद्यार्थ्यांचे अपघात झाले असून दररोज अनेक लोक जखमी होत आहेत.

भुयारी मार्ग सुरु झाल्यापासून वारंवार रेल्वे पुलाखालून सातत्याने होत असलेली पाण्याच्या गळतीमुळे या ठिकाणी सातत्याने लहान- मोठे अपघात दररोज घडतात. मिरज रोड परिसरात एमआयडीसी, सूतगिरणी, अनेक मोठे उद्योग समूह, शाळा कॉलेजेस आहेत, येथे जाणार्या येणार्या नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सांगोला शहरातील मिरज रेल्वे गेटवरील भुयारी मार्गाची नेहमीच्या पाणी गळतीमुळे अत्यंत दुरावस्था झालेली आहे. भुयारी मार्गावरील रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्यावर नेहमीचे पाणी साचून राहते. मोठ्या प्रमाणावर गाळ असतो. गाळामुळे ये-जा करणार्या वाहनांना अपघातास सामोर जावे लागत. रेल्वे पुलाखाली पाण्याचा व चिखलाचा राडाच मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे अनेक नागरिक घसरुन पडत असून गंभीर प्रकारच्या इजा झाल्या असुन रेल्वे प्रशासन, नगरपरिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.