जत – मंगळवेढा रस्त्याच्या कामाला सुरुवात 

अनेक दिवसांपासून रेंगाळत असलेल्या मंगळवेढा- जत घेरडी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्यावर अनेक अपघात झाले होते. यामुळे रस्त्यासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागत होती. आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत टप्पा क्रमांक तीन व केंद्र शासन सहाय्य अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील पारे-जत बिळूर ते राज्य हद्द रस्ता या १५६ कि.मी.च्या १७७ कोटी ६० लाख रुपये निधीतून हा रस्ता काँक्रिटीकरण करुन बांधण्यात येणार आहे. रस्त्यालगत प्रवासी निवाराशेड, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करत उत्कृष्ट रस्ता तयार करण्याचे नियोजन आहे.

रस्ता पूर्ण झाल्यानं तर दळणवळणाची उत्तमप्रकारे सोय होणार आहे तसेच वेळेची व पैशाची बचत होणार आहे. दर्जात्मक रस्त्यामुळे प्रवासही सुखकर होणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी शहाजी पाटील यांनी निधी आणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले होते. आता निवडणूक संपल्यानंतर लगेच कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे लोकांना या रस्त्याचे अनेक फायदे होणार आहेत. जत व मंगळवेढा या भागातील लोकांना जाण्यासाठी हा मार्ग अतिशय सोयीचा असल्याने भविष्यात हा विकासाचा मार्ग ठरणार असल्याचे बोलले जाते.