सांगोला तालुक्यातील महीम येथे आढळला यादवकालीन शिलालेख 

सांगोला तालुक्यातील महीम या गावात ऐतिहासिक सर्व्हे करताना इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांना यादव काळातील राजाने दिलेल्या दानासंदर्भात माहिती सांगणारा हा शिलालेख आढळला. या शिलालेखावर देवनागरी लिपीत तब्बल २२ ओळी कोरण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने शिलालेख स्वच्छ करून ताबडतोब या शिलालेखाचे अणवेकर यांनी ठसे घेतले. हे ठसे पुणे येथील इतिहास अभ्यासक अनिल दुधाने व अथर्व पिंगळे यांच्याकडे वाचन करण्यासाठी पाठविले. त्यानुसार हा शिलालेख तेराव्या शतकातील असल्याचे स्पष्ट झाले. या शिलालेखावर शक ११९१ चा काल उल्लेख असून मंदिराला दान दिल्याबद्दल देवगिरीचा राजा महादेवराय यादव यांच्याबाबत गौरवोद्गार आहेत. 

पिल्ले यांच्या जंत्रीनुसार शिलालेख कोरल्याची तारीख ९ मे १२६९ अशी आहे. महादेव राजाच्या काळातील एका मंदिरास २० गद्यान (सुवर्ण नाणे) दिल्याची नोंद असलेला महत्त्वाचा उल्लेख शिलालेखात आला आहे. दिलेले दान नमूद करणे या शिलालेखाचा मुख्य विषय आहे. शिलालेखाची भाषा संस्कृत असून मराठी मधील जुन्या शैलीची काही अक्षरे शिलालेखावर कोरलेली आहेत. शिलालेखावर एकूण २२ ओळी असून अठराव्या ओळीनंतरचा शिलालेखाच्या शिळाचा भाग खंडित झाला तो भागही शोधण्यात अणवेकर यांना यश मिळाले आहे. शिलालेखाची सुरवात ‘स्वदत्ता परदत्तां वा यो हरते वसुंधरा’ अशी करण्यात आली आहे. हे प्रसिद्ध शाप वचन आहे.