अंगणवाडी कर्मचऱ्यांचा सद्या विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आमदार आवाडे यांना निवेदन देण्यात आले.अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ, इचलकरंजी शहरी प्रकल्पातर्फे आमदार प्रकाश आवाडे यांना निवेदन दिले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ४ डिसेंबरपासून बेमुदत संप सुरू आहे. राज्यामधील दोन लाखांहून अधिक सेविका व मदतनीस संपामध्ये सहभागी झाल्या आहेत. मागील संपावेळी तुटपंजी वाढ व अन्य प्रश्नांवर आश्वासन दिले गेले.
महागाई भत्ता लागू करण्याच्या मागणीवर कोणतीही कारवाई केली नाही. या सर्वांमुळे महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला आहे. आमदार आवडे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडावा, मार्ग काढण्यासाठी आग्रह धरावा. शासनाला प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडावे. प्रश्न सोडवण्याबाबत चर्चा न झाल्यास सभात्याग करावा, असे निवेदनात नमूद केले आहे.
शिष्टमंडळात सुनील बारवाडे, रेणुका गुंडी, उमा तारळेकर, सुजाता गायकवाड, माया खटावकर, रेखा जगताप, रुपाली भंडारे, दीपा कवडे, माया खटावकर आदी सहभागी होत्या.