शिरोळमधील रस्ते, गटारींसाठी ६२ कोटी मंजूर :आमदार यड्रावकर

हिवाळी अधिवेशन सद्या सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा चालू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्यांच्या प्रस्तावात शिरोळ तालुक्यातील दत्तवाड ग्रामीण रुग्णालय नविन इमारत व प्रमुख रस्ते व गटारींसाठी ६२ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

शिरोळ तालुक्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याचे मजबुतीकरण व अंतर्गत गटर्स करणे तसेच दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम जीर्ण झाले होते. त्यापासून रुग्णांना व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांची अनेक दिवस नवीन इमारत बांधकामासाठी वारंवार मागणी होती. शशिकला क्षयरोग आरोग्यधाम, जयसिंगपूर येथील संरक्षक भिंत बांधणे कामीही मागणी होती. राज्य शासनाकडे या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. हिवाळी अधिवेशनात या कामांना निधी मंजूर करण्यात यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सहकार्य मिळाल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले.

शिरोळ तालुक्याच्या सर्वांगिण विकास कामासाठी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता. भविष्यातही तालुक्यातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करताना विकासकामांसाठी शासनाच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणात निधी आणणार आहोत, असेही आमदार पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.