इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक आतिदक्षता विभागातील (आयसीयु ) अचानक वातानुकुलीत यंत्रणा (एसी) बंद पडल्याने चांगलीच तारांबळा उडाली. परंतु, विभागातील नर्सिंग स्टाफ व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत व प्रसंगावधान राखत १४ रुग्णांना जुन्या अतिदक्षता विभागात स्थलांतरीत केले. तज्ज्ञांच्या पाहणीमध्ये मोटर जळाल्याचे निदर्शनास आले. नर्सिंग स्टाफ व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. सीमाभागासह इचलकरंजी परिसरातील सामान्य रूग्णांसाठी आधरवड असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात २४ बेडचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यान्वित आहे. परंतु हा विभाग हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची अपुच्या संख्येमुळे सध्या १६ बेडचा विभाग सुरू आहे. याठिकाणी १४ रुग्ण उपचार घेत होते. शुक्रवारी या विभागातील वातानुकुलित यंत्रणा बंद पडल्याने चांगलाच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे विभागात खिडकीच नसल्याने हवा कोंदट झाली होती. रुग्णालय प्रशासनाने तात्काळ स्थानिक तज्ञांना बोलावून दुरूस्तीचा प्रयत्न केला.
मात्र, एसीची मोटर जळाल्याने ती बदलण्याची आवश्यकता असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले. त्यामुळे येथील रुग्णांना रुग्णालयातील जुन्या अतिदक्षता विभागात स्थलांतरीत करण्यात आले आहे. वातानुकुलित यंत्रणेच्या दुरूस्तीसाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च असून रुग्णालय प्रशासनाकडे सध्या फंडच शिल्लक नसल्याने २४ बेडचा अतिदक्षता विभाग कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. रुग्णालयात अनेक सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामधून २०२१ मध्ये २४ बेडच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागास मंजूरी देण्यात आली होती. या विभागाचे काम २०२२ मध्ये पूर्ण झाले. मात्र आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी मोठा कालावधी लागण्याने त्यानंतर हा विभाग वापरत आला. या अत्याधुनिक अतिदक्षता विभागामधील हवा शुद्ध राहण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारी येथील एसी बंद पडल्या नंतर काही काळात वातावरण कोंदट झाले होते. विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वातावरणातील बदल जाणवताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत रुग्णांना तत्काळ जुन्या अतिदक्षता विभागात स्थलांतरीत केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असे रूग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
