शहापूर पोलीस ठाणे लवकरच हक्काच्या जागेत स्थलांतरित होणार,नागरिकांना मिळणार जलद सेवा

अलीकडे अनेक नवनवीन विकासकामांना जोर आलेला आहे. विकासकामांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती येणार आहे. सध्या शहापूर पोलीस ठाणे लवकरच नवीन जागेत स्थलांतरित होणार आहे. शहापूर येथील मलाबादे चौक जे के नगर येथे अत्याधुनिक सुविधा नियुक्त नवीन इमारत उभी राहिली असून सध्या ती अंतिम टप्प्यात आहे.भाड्याच्या जागेत अपुऱ्या सोयी सुविधांमुळे पोलिसांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. नवीन इमारतीत प्रशस्त कार्यालय, अत्याधुनिक लोकप, स्वतंत्र विभाग, हिरवळ असलेला परिसर आणि भक्कम संरक्षण कंपाऊंड यासारख्या सुविधा आहेत. यामुळे पोलिसांचे काम अधिक कार्यक्षम होणार असून नागरिकांना तत्पर सेवा मिळणार आहे.

गेल्या तीन वर्षात मलाबादे चौकातील गट नंबर 903 ब मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या देखरेखी खाली ही इमारत बांधण्यात आली. इमारतीसाठी बोरवेल मारून पाणीपुरवठ्याची ही सोय करण्यात आली आहे. नवीन ठिकाण हद्दीच्या केंद्रस्थानी असल्याने तारदाळ, खोतवाडी, कोरोची, यड्राव आणि औद्योगिक वसाहतीतील नागरिकांना जलद सेवा मिळेल. स्थानिक तसेच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये या नवीन इमारतीबाबत मोठी उत्सुकता आहे. शहापूर पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील अत्याधुनिक पोलीस ठाण्यांपैकी एक ठरणार आहे.