खानापूर तालुक्यातील घानवड येथील माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, ही कारवाई एलसीडीच्या पथकाने केली. या खूनप्रकरणी यापूर्वीच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. विशाल बाळासो मदने (वय २३), सचिन शिवाजी थोरात (वय २५, दोघेही रा. घानवड, ता. खानापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुरुवार दि. ५ रोजी दुपारी घानवडचे माजी उपसरपंच बापूराव चव्हाण बुलेटवरून पोल्ट्री फार्मकडे निघाले होते.
त्यावेळी गार्डी गावच्या हद्दीत नेवरी रस्त्यावर चव्हाण यांचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. हा खून मदने आणि थोरात यांनी केल्याचेही स्पष्ट झाले होते.
पोलिस त्यांचा शोध घेत होते. त्यांच्या शोधासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. पथक त्यांचा शोध घेत असताना पथकातील उदय साळुंखे यांना दोघेही संशयित पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी येथील पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
