ख्रिसमस, न्यू ईअरच्या तोंडावर खिशाला झळ! गोव्याला येण्यासाठी विमान तिकीटे महागली

ख्रिसमस, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. याच कालावधीमध्ये विमान प्रवास, बस प्रवास तसेच हॉटेलच्या दरांमध्ये सुद्धा वाढ होते.गेल्या वर्षीदेखील विमान तिकिटांमध्ये वाढ झाली होती आणि उपलब्ध माहितीनुसार यंदाचा विमान प्रवास 17 टक्क्यांनी महागला आहे.

तर दुसरीकडे देशांतर्गत विमान प्रवास स्वस्त झाला आहे. विमान कंपन्यांनी दिल्ली ते मुंबई, मुंबई ते बेंगळूरू तसेच मुंबई ते चेन्नईच्या तिकीट दरात 24 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये 28 टक्क्यांपर्यंत घट केली आहे.मात्र दिल्ली-बेंगळूरू, दिल्ली-श्रीनगर सोबतच गोव्याचा विमान प्रवास महागला आहे.

असे आहेत विमान तिकीटांचे दर (24 डिसेंबर ते 01 जानेवारी)

या मार्गावरील प्रवास तिकीटात घट
मार्ग 2022 2023 घट
मुंबई ते चेन्नई 5431 3889 -28.04 %
मुंबई ते बेंगळुरू 6133 4662 -23.09%

या मार्गावरील प्रवास तिकीटात वाढ

मार्ग 2022 2023 वाढ

दिल्ली ते गोवा 6950 8100 +17.01 %

मुंबई ते गोवा 4080 4580 +12.03 %

दिल्ली ते बेंगळुरू 7602 7823 +02.91 %

दिल्ली ते श्रीनगर. 5963. 6062. +01.66%

इतर ठिकाणी प्रवास स्वस्त का आहे?

माहितीनुसार, विमान इंधनामध्ये प्रति लिटर 118 रुपयांवरून 106 रुपयांपर्यंत घट झाल्याने एअरलाइन्स कंपन्यांनी विमान तिकीटांचा दर कमी केला.

दिल्ली ते गोव्याचा प्रवास महाग का?

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा हे सर्वांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. यामध्ये इतर प्रमुख शहरांपैकी दिल्ली ते गोवा विमान तिकीट महाग आहे. याचे कारण म्हणजे देशांतर्गत पर्यटकांमध्ये दिल्लीचे पर्यटक गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे दिल्लीचा प्रवास 17 टक्क्यांनी महागला आहे.

डिसेंबर महिन्यात गोव्यात ‘या’ गोष्टींची मेजवानी..!

ख्रिसमस आणि न्यू ईअर शिवायही या महिन्यात गोव्यामध्ये अनेक इव्हेंट्स असणार आहेत. प्रामुख्याने किनारी भागात विविध डान्स आणि म्युझिक इव्हेंट्स पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.