एसटी महामंडळाच्या विविध सवलतधारी प्रवाशांसाठी महामंडळाच्या ताफ्यातील बसेसमध्ये आसन व्यवस्था बदलण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. नववर्ष म्हणजे १ जानेवारी (सोमवार) नवीन आसन व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. आरक्षण व्यवस्थेतही बदल करावे लागणार आहेत.
विधिमंडळ सदस्यांना आता साध्या बसमध्ये १, २ ऐवजी ७, ८ आसन राखीव करण्यात आले आहे. त्याप्रमाणेच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, महिला अधिस्वीकृतीधारक पत्रकार, एसटी कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्था सुद्धा बदलण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये विविध सामाजिक घटकांना सेवाप्रकारनिहाय सवलत दिली जाते, ज्यामध्ये साधी, निमआराम, शयनआसनी, विनावातानुकूलित शिवशाही, वातानुकूलित, व्होल्वो, शिवाई, विनावातानुकूलित शयनयानमध्ये राखीव आसने उपलब्ध करून दिली आहेत.
सद्यःस्थितीमध्ये एसटी महामंडळात नव्याने ईटीआयएम – ओआरएस कार्यप्रणाली कार्यान्वित झालेली आहे. आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलबजावणी १ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. आसन क्रमांक बदलण्याची कार्यवाही यंत्र अभियांत्रिकी विभागाकडून स्टिकर्स लावून करण्यात येणार आहे.