हुपरी पंचक्रोशीतील गावांमध्ये लम्पीचा फैलाव! शेतकरी वर्गामध्ये भीती…….

हुपरीसह शहरात अनेक आजारांचा नागरिकांना त्रास सहन करावाच लागत आहे अशातच आता मूक जनावरांना देखील अनेक आजारांशी लढावे लागत आहे. हुपरी पंचक्रोशीतील गावांमध्ये गोठ्यातील गाय, वासरांना लम्पी आजाराने ग्रासले असून शेतकरी वर्गामध्ये याबाबत भीती पसरली आहे. या आजारामुळे जनावरांच्या शरिराला गाठी येतात, हा व्हायरस जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमीत होतो. हा आजार डास चावल्यामुळे होतो. या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो. त्यांचे वजन कमी होते, जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टिपकते, तोंडातून लाळ पडते, शरिरावर छोट्या गाठी यायला लागतात, जनावर दूध कमी देते.

रेंदाळमध्ये गाय व पाडे तर यळगूड येथील एक गाय मृत्यूमुखी पडली आहे. यामुळे हा व्हायरस वाढण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी लसीकरण न केलेल्या शेतकरी वर्गाने प्रथमत: व्हॅक्सिनेशन करावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी रवींद्र माळी यांनी केले आहे. रांगोळी, रेंदाळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी कोरे यांनी गाय वासरू वर्गातील १ हजार २०० तर डॉ.माळी यांनी हुपरी विभागातील १ हजार २३० जनावरांचे व्हॅक्सिनेशन झाल्याची माहिती दिली आहे. परिसरातील तीन चार गायींचा मृत्यू झाला आहे.

तर रांगोळी व यळगूड येथील गाय वासरांमध्ये उपचार यशस्वी ठरला आहे. लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथीच्या काळात राज्यात उपाययोजना तसेच लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी इंगळे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. काही शेतकऱ्यांनी गैरसमजुतीमुळे लम्पीची लस जनावरांना दिली नाही. आजारी पडल्यावर खाजगी व्हेटनरी डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली गेली. जर पुर्वी लस टोचून घेतली असेल तर शरिरात प्रतिकारशक्ती वाढते आणि साथीच्या आजारांची लागण झाल्यास उपचाराने मात करता येते. सध्या लम्पीच्या संसर्गाचे प्रमाण कमी आहे.

या आजारामुळे शेतकरी वर्गाने धास्ती घेतली असली तरी व्हॅक्सिनेशन करुन घेणे हाच रामबाण उपाय आहे. तेव्हा शेतकरी वर्गाने गाय वासरांमध्ये अशी लक्षणे दिसताच संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याची कल्पना द्यावी जेणेकरून यावर कशी मात करता येईल यासाठी ते शासनाच्या विविध तज्ञ पशुवैद्यकीय मंडळींनी सुचविलेली औषधे व उपाययोजना करतील.