करणी, जादूटोणाप्रकरणी महिला कॉन्स्टेबलला अटक

करणी, जादूटोणा प्रकरणातून 84 लाखांची लुबाडणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिला पोलिस कॉन्स्टेबलला अटक केली. सिंधुदुर्ग पोलिस दलातील तृप्ती संजय मुळीक (रा. ओरोस, ता. कुडाळ, जि.सिंधुदुर्ग) असे त्यांचे नाव आहे. जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. 11) ही कारवाई केली. याप्रकरणी सुभाष हरी कुलकर्णी (वय 77, रा. दत्त गल्ली, गंगावेस, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

तुमच्या घरातील व्यक्तीवर करणी केली आहे, त्यामुळे कसलेही यश येत नाही, मुलांची लग्ने होत नाहीत, अशी भीती घालून काही जणांनी कुलकर्णी यांच्याकडून तबब्ल 84 लाखांचे सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य लुबाडले आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी शशिकांत नीळकंठ गोळे (वय 69, रा. बारामती) व कुंडलिक शंकर झगडे (वय 38, रा. जेजुरी) यांना अटक झाली आहे. मुख्य संशयित दादा पाटील महाराज याच्यासह इतर अद्याप पसार आहेत.