Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अन् वेळ ठरली, ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार

मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर अखेर शिक्कामोर्तब झालेय. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांना झुकते माप दिल्याचे सूत्रांनी सांगितलेय. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २०-१०-१० असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचे समजतेय. हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. भाजपचे सर्वात जास्त आमदार असल्यामुळे वर्चचष्मा त्यांचाच असेल. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता तिन्ही पक्षाचे मिळून ३५ मंत्री शपथ घेणार असल्याचे समोर आलेय.

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत भाजपचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपकडे सर्वाधिक २० खाती राहण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना १०-१० खाती मिळणार आहे.देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत झालेल्या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपकडेच राहतील. नगरविकास शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला महसूल मिळू शकते. भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खाते इतर गटाला सोपवण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे.