जुगार अड्डे, कॅसिनोंतून जिल्ह्यात रोज दीडशे कोटींची उलाढाल!

स्थानिक यंत्रणांसह फाळकूट गुंडांना हाताशी धरून परप्रांतीय अवैध व्यावसायिक, गुन्हेगारी टोळ्यांनी शहर, जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. पंधरवड्यापासून दोनशेवर जुगारी अड्डे फार्मात आले असून, त्यात कॅसिनोंची भर पडली आहे.सायंकाळी सहा ते पहाटेपर्यंत अड्डे गजबजू लागले आहेत. रोज सरासरी 150 कोटींची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. सीमावर्ती भागात तर रात्रंदिवस हाऊसफुल्ल धंदा सुरू आहे. तीन पानी जुगारी अड्ड्यांचे जिल्ह्यात विशेष करून महामार्ग, सीमाभागात अक्षरश: पेव फुटले आहे. गोव्यातील कॅसिनोची एन्ट्री गडहिंग्लज, आजरा, इचलकरंजीसह कागलपर्यंत पोहोचली आहे.

रात्रंदिवस चालणार्‍या कॅसिनोंवर सीमाभागातील महाविद्यालयीन तरुणांसह व्यावसायिक, शेतकर्‍यांच्या पोरांची बरबादी होऊ लागली आहे. बँका, पतसंस्थांसह खासगी सावकारांकडून व्याजाने मोठ्या रकमा उचलून तरुण कॅसिनो अड्ड्यांवर पडून आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांसह दागिने गहाण ठेवून अनेक जण भिकेकंगाल बनले आहेत. आजरा, चंदगड, गडहिंग्लजसह निपाणी, संकेश्वर, बेळगाव परिसरातील अनेक व्यावसायिक रस्त्यावर आले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक जुगार अड्डे हातकणंगले तालुक्यासह शिरोळ, करवीर, कागल, गडहिंग्लज परिसरात सुरू आहेत. अलीकडे त्यात मोठ्या प्रमाणात भर पडल्याने ही संख्या 185 वर पोहोचली आहे, तर 15 ठिकाणी कॅसिनोंची एन्ट्री झाली आहे. कागलजवळील गणेशच्या कॅसिनोवर रोज सरासरी दीड ते दोन कोटींची उलाढाल असल्याचे सांगण्यात आले. गजबजलेल्या ठिकाणी हा अड्डा बिनभोबाट सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आंतरराज्य गुटखा, बनावट दारू व अमली तस्करी टोळ्यांचीही उलाढाल वाढली आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर किंबहुना महामार्गावरील पोलिस बंदोबस्तात शिथिलता आल्यानंतर तस्करी टोळ्यांना मोकळीक मिळाली आहे. कोल्हापूर शहरासह गांधीनगर, हुपरी, इचलकरंजी, शिरोळ, वडगाव, कुरुंदवाड ही शहरे गुटखा तस्करीची सेंटर बनत चालली आहेत.