Ladaki Bahin Yojana : 1500 की 2100, खात्यावर किती रुपये येणार? ‘लाडकी बहीण’साठी कोटींची तरतूद,

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विधानसभेत ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या.यात लाडकी बहीण योजनेसाठीही मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यावर २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं.

आता महायुतीचं सरकार येताच या योजनेसाठी तरतूदसुद्धा करण्यात आली आहे. राज्य सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये माझी लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद प्रशासकीय पूर्ततेसाठी आहे. सरकारकडे लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला साडे तीन हजार कोटी रुपये इतकं बजेट आहे. त्यामुळे डिसेंबर ते मार्च महिन्याचे हप्ते देण्यासाठी १४ हजार कोटींची आवश्यकता आहे. सध्याची तरतूद आणि मागील शिल्लक मिळून २० हजार ४०० कोटी रुपये इतकी रक्कम आहे. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार २१०० रुपयांचा हप्ता देणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.