मंत्रीपदापासून कायमच वंचित राहिलेल्या खानापूर मतदारसंघाला यावेळी देखील मंत्रीपदाने हुलकावणी दिलेली आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचा राजकीय वारसा सुहास भैया बाबर यांच्याकडे आहे. अनिल बाबर यांनी चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अनिल बाबर यांना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना सुद्धा त्यांना मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे यावेळेस सुहास भैया बाबर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती.
खानापूर विधानसभा मतदारसंघातील पण जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले गोपीचंद पडळकर हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. भाजपने त्यांना विधानपरिषदेवर ही संधी दिली होती. गोपीचंद पडळकर हे यावेळी विधानसभेमध्ये निवडून आल्यामुळे त्यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात होते. मात्र यावेळेस दोघांनाही मंत्रीपद न मिळाल्यामुळे खानापूर मतदार संघाचा मंत्रिमंडळाचा दुष्काळ हा कायमच राहिलेला आहे. परंतु आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपीचंद पडळकर यांच्यावर व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुहास भैया बाबर यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवितात याकडे जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे.