मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत…

राज्य मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कोल्हापुरात प्रथमच आगमन झाले. त्यांची शहरातून जल्लोषी मिरवणूक निघाली. दरम्यान, मिरवणुकीला प्रारंभ होण्याअगोदर दोन्ही मंत्र्यांनी, करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. शनिवारी सकाळी मंत्री मुश्रीफ व मंत्री आबिटकर यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी मंदिरात देवस्थान समितीतर्फे शाल, श्रीफळ व देवीची साडी देऊन स्वागत केले. मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कावळा नाका येथील महाराणी ताराबाईच्या पुतळ्याला अभिवादन केले.

त्यानंतर त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवाय या दोन्ही मंत्र्यांना, जेसीबीच्या साह्याने मोठा पुष्पहार घालून, कार्यकर्त्यांनी त्यांचें जंगी स्वागत केले. फुलांनी सजवलेले वाहन, त्यापुढे दुचाकीवरून कार्यकर्ते, फटाक्यांची आतषबाजी, झांज पथक अशा उत्साही वातावरणात शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीत माजी खासदार संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, करवीर निवासिनी अंबाबाई, शिव-शाह फुले, आंबेडकर यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली आहे. जे काम आम्ही हातात घेणार आहे, ते महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी असून त्या कामात यश प्राप्ती होऊ दे असे साकडे अंबाबाईला घातले असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तर कोल्हापूर जिल्ह्याल माझ्या आणि आबिटकरांच्या रूपाने दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. या माध्यमातून कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न सोडवणार असल्याचा संकल्पहि केला असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवत जिल्ह्यातील प्रलंबित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जिल्ह्यातील अपूर्ण सर्व प्रकल्प मार्गी लावले जातील, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

मंत्री आबिटकर म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन अत्यंत नियोजनबर पद्धतीने कोल्हापूरचा विकास गतीने साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी जबाबदारीने योगदान देऊन मिळालेल्या संधीचे सोने करु. जिल्ह्यातील नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठ निश्चितच प्रयत्न केले जातील. काळम्मावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने राबवण्यासाठी जलसंपद विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.