पेठवडगाव येथील एस.टी. स्टैंडसमोर मुख्य रस्त्यावर महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटांत झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीत तिघेजण जखमी झाले. यात एक अल्पवयीन असून, अनिल शिवाजी माने, निखिल दीपक माने अशी इतर जखमींची नावे आहेत. याबाबत वडगाव पोलिस ठाण्यात पोलिसांच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार अनिल शिवाजी माने, निखिल दीपक माने (रा. पेठवडगाव), विकास अवघडे व एक अल्पवयीन (रा. भादोले) यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी दंगा केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एस.टी. स्टैंडसमोर भादोले येथील युवक आपल्या मित्रांसोबत थांबला होता. यावेळी वडगाव येथील युवकांचा गट तेथे आला. त्यांनी कॉलेजमध्ये झालेल्या वादाचा जाब विचारत मारहाण सुरू केली. दोन्ही गट एकमेकांना भिडले. या धुमश्चक्रीत दगड, विटांचा वापर करण्यात आला. या हाणामारीमुळे स्टैंड परिसरात मोठा जमाव जमला. या मार्गावरील वाहतूकही थांबली. भीतीने नागरिकांनी स्टँडमध्ये आसरा घेतला. ही घटना समजताच सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, हवालदार महेश माने सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी हाणामारी करणाऱ्या युवकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.