व्हॉट्सॲप’ हे मेटा कंपनीचा इन्स्टंट मेसेजिंग आणि कॉलिंग प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील जवळजवळ प्रत्येक अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी व्हॉट्सॲप हे अतिमहत्त्वाचे ॲप आहे.परंतु, १ जानेवारीपासून मेटा आपल्या काही नियमांत बदल करत आहे, हे बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे अनेक स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप हे ॲप सपोर्ट करणे बंद करेल, असे कंपंनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. व्हॉट्सॲपची पेरेंट कंपनी ‘मेटा’ने नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच निवडक अँड्रॉइड फोनवरून त्यांच्या सेवा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
१ जानेवारी २०२५ पासून, व्हॉट्सॲप १० वर्षांपूर्वीची ऑपरेटींग सिस्टम (OS) किंवा जुन्या आवृत्त्यांवर चालणाऱ्या विविध अँड्रॉइड डिव्हाइसेसना सपोर्ट करणार नाही, अशी घोषणा मेटाने केली आहे. नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी आणि ॲपची सुरक्षा आणि कार्यक्षमता राखण्यासाठी कंपनीच्या नियमित अपडेट्सचा हा एक भाग असल्याचे देखील कंपनीने म्हटले आहे.
‘या’ स्मार्टफोनमधील ‘WhatsApp’ होणार बंद
या निर्णयाचा परिणाम अनेक मोबाईल कंपन्यांच्या मॉडेलवर होणार आहे. यामध्ये दशकापूर्वी रिलीज झालेल्या Samsung (सॅमसंग), LG (एलजी) आणि Sony (सोनी) सारख्या प्रसिद्ध ब्रँडच्या काही मॉडेल्सचा समावेश आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप सेवा वापरत राहण्यासाठी नवीन अँड्रॉइड आवृत्त्या चालवणाऱ्या उपकरणांवर अपग्रेड करण्यास प्रोत्साहित केले जाते. परंतु, पुढील काही दिवसांत खाली दिलेल्या अँड्रॉइड फोनमध्ये व्हॉट्सॲप सपोर्ट करणार नसल्याचे मेटाने म्हटले आहे.
सॅमसंग (Samsung) : Galaxy S3, Galaxy Note 2, Galaxy Ace 3, Galaxy S4 Mini
मोटोरोला (Motorola) : Moto G (1st Gen), Razr HD, Moto E 2014
एचटीसी (HTC) : One X, One X+, Desire 500, Desire 601
एलजी (LG) : Optimus G, Nexus 4, G2 Mini, L90
सोनी (Sony) : Xperia Z, Xperia SP, Xperia T, Xperia V