इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने थकीत घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम राबविली जात आहे. वार्षिक ७१ कोटीचे घरफाळा वसुलीचे उद्दिष्ट कर विभागाने ठरवले आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यावर्षी डिसेंबर अखेरचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महापालिका सध्या अॅक्शन मोडवर आहे.
शहरामध्ये विविध ठिकाणी शासकीय मालकीच्या इमारती असून सदर इमारतींचा घरफाळा हा २ कोटी पेक्षा जास्त रुपये थकीत आहे. सदरची थकबाकी वसूल करण्याकडे महानगरपालिकेने सध्या लक्ष केंद्रित केले आहे. शहरामध्ये शासकीय मालकीच्या एकूण १३५ मिळकती आहेत. त्यापैकी आयजीएम, पोलीस खात्याच्या इमारती, प्रांत कार्यालय या मिळकतींच्या घरफाळ्याची थकबाकीची रक्कम मोठी असल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असून त्यानंतरही घरफाळ्याची थकबाकी न भरल्यास सदर इमारती या सील करण्याची प्रक्रिया ही करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.