रविवारी झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांना काल सकाळी सोशल मिडियावरील स्टेटसद्वारे आभार व्यक्त केल्यानंतर फुटबॉलपटूने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी अकराच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. उमेश बबन भगत (वय ३८, रा. एन. टी. सरनाईकनगर, पाचगाव परिसर) असे त्याचे नाव आहे. करवीर पोलिसांनी दिलेली माहिती अशी उमेश फुटबॉलपटू म्हणून कोल्हापुरात परिचित आहे. त्याने नावाजलेल्या फुटबॉल संघांतून चांगला खेळ केला आहे.
नेहमीप्रमाणे काल सकाळी तो त्याच्या मुलींना शाळेत सोडून आला. त्यानंतर त्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरातच त्याची पत्नी इलेक्ट्रीक दुकानात नोकरीला आहे. तिला याची माहिती मिळताच तिने स्थानिकांच्या मदतीने त्याला सीपीआरमध्ये दाखल झाले; मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. उमेश भगत मिलिटरी कॅन्टीनमध्ये रोजंदारीवर नोकरी करीत होता. पोलिसांकडील तपासात अद्याप आत्महत्येचे कारण पुढे आलेले नाही. त्याच्या मागे पत्नी, वडील, बहीण आणि दोन मुली असा परिवार आहे.
दरम्यान, उमेशच्या आईनेही काही वर्षांपूर्वी तर त्याचा भाऊ महेश याने सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर आज उमेशबाबतची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवारात कळताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर अनेकांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. तो अनिल मंडलिक स्पोर्टिंग, जयभवानी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ व बालगोपाल तालीम मंडळांकडून खेळला होता.