इस्लामपुरात सीएनजी गळती; वीस मिनिटांचा थरार

इस्लामपूर येथील बस स्थानक परिसरात आज दुपारी चालू गाडीत असलेल्या सीएनजी सिलिंडरमधून अचानक गळती सुरू झाल्याने पंधरा ते वीस मिनिटांचा थरार आज नागरिकांनी अनुभवला. अचानक झालेला मोठा आवाज आणि सिलिंडरमधून बाहेर पडणारा सीएनजी यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. वीस मिनिटांनी गॅस गळती थांबल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काही काळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक यंत्रणा ठप्प झाली होती.

येथील बस स्थानक परिसरात एसटी बाहेर पडण्याच्‍या फाटकावर असलेल्या रिक्षा स्टॉपला लागूनच असलेल्या रस्त्यावर दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. वाघवाडी परिसरात सीएनजी प्रकल्प आहे. तिथून सिलिंडर भरून कवठेमहांकाळ येथे निघालेल्या एका टेम्पोतील सिलिंडरमधून अचानक गॅस गळती सुरू झाली. त्याचा आवाज ऐकून चालकाने पटकन वाहन बाजूला घेत बाहेर पलायन केले.

अचानक गळती आणि येत असलेल्या आवाजाने आजूबाजूला घबराट निर्माण झाली. बस स्थानक परिसरात जितके व्यावसायिक आहेत, त्या सर्वांनी आपापले शटर बंद करत दूर जाऊन थांबणे पसंत केले. पंधरा मिनिटे सिलिंडरमधून मोठ्या आवाजाने गळती होत राहिली आणि ती संपताच आवाज शांत झाला. या गाडीने सीएनजी प्रकल्पावर जाऊन पुन्हा तपासणी करून घेतली. दरम्यान, काहींनी इस्लामपूर नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला होता.

अग्निशमन विभागाचे वाहन आणि अधिकारी, कर्मचारी स्थानकावर पोहोचेपर्यंत गॅस सिलिंडरचे वाहन निघून गेले होते. या प्रकाराने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, काही वेळ हा थरार नागरिकांनी अनुभवला.