लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र आपना सर्वाना दिसूनच आले. अनेक पक्षप्रवेश होत राहिले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेक नेतेमंडळींची नाराजी देखील दिसून आली. तर काहींची एकनिष्ठता देखील दिसून आली. इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत हीच एकनिष्ठता पहायला मिळाली.
भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आपल्या पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले. राज्यात पक्षनिष्ठा असलेल्या भाजपच्या यादीत इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. विळ्याभोपळ्याचे सख्य असलेल्या आवाडे परिवाराशी त्यांनी पक्ष म्हणून जमवून घेतले. या बदल्यात त्यांचा यथोचित सन्मान पक्षाकडून लवकरच होणार आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शिल्लक कोट्यातून त्यांना संधी मिळणार आहे हे जवळपास नक्की झाले आहे.