बऱ्याच ठिकाणी अलीकडे मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशातच आता चक्क एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार मंगळवेढा तालुक्यात घडला आहे. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे एकाच रात्री तीन घरफोड्या चोरटयांनी करून सोने, रोख रक्कम असा एकूण १ लाख ८२ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी सचिन स्वामी हे व्यवसायाने टेलरिंगचे काम करीत असून दि.२९ च्या पहाटे ४.०० च्या दरम्यान, यातील फिर्यादी यांचे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ८०० रुपये किंमतीचे चांदीचे गळयात घालण्याचे शिवलिंग, ८०० रुपये किमतीचे एक भार वजनाची चांदीची जोडवी, एक हजार रुपये किमतीचे टेलरिंग साहित्य, दुकानातील रोख रक्कम तसेच हरी जाधव यांची २० हजार रुपये किमतीची ४ ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी, त्याचबरोबर सचिन डांगे यांचे रोख १० हजार रुपये असा एकूण १ लाख ८२ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, चोरट्यांनी दगडू जाधव यांच्या बंद घराचे व दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.