प्रत्येक भागात अनेक कारणांसाठी म्हणजेच अनेक मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी हे संपावर जात असतात. काही ठिकाणी उपोषण देखील केले जाते. सांगोला तालुक्यातील मंडलाधिकारी, तलाठी यांनी बेमुदत संप पुकारला आहे. सोलापूर जिल्हा तलाठी संघ सोलापूर यांनी जिल्हाधिकारी यांना १८ डिसेंबर रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अतिकालिक भत्ता मिळणेबाबत, लॅपटॉप व स्कॅनरसह प्रिंटर्स मिळावे या प्रमुख मागण्यांसंदर्भात निवेदन दिलेले होते.
परंतु अद्याप या मागण्या प्रलंबित आहेत. मागण्या पुढील १५ दिवसांत पूर्ण कराव्यात असे निवेदनात नमूद केले होते. परंतु मागण्यांसंदर्भात जिल्हा प्रशासनाने जाणीपूवर्क दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ८ डिसेंबर रोजीच्या जिल्हा संघाच्या बैठकीत सर्वानुमते ठरल्यापमाणे जिल्ह्यातील सर्व ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) व तलाठी संवर्गातील मंडलाधिकारी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहे.
त्यामध्ये सांगोला तालुका तलाठी संघटना सहभागी राहील असे निवेदनात म्हटले आहे. सांगोला तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व मंडलाधिकारी व तलाठी यांनी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करून संपात सहभागी झाले असल्याचे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांना दिले आहे.