मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.मात्र, शासन आदेश न काढल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली होती.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतच्या शासकीय आदेशाची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी आज मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली. उदय सामंत हे अभिजात भाषेची अधिसूचना स्वीकारण्यासाठी राजधानी दिल्लीत दाखल झाले होते.
देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर, अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी आपली मराठी भाषा ही आता देशातील 7 वी भाषा ठरली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या 3 ऑक्टोबरच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला होता.2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली होती. तामिळनंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला.