19 जानेवारीला शिंदोळी ग्राम पंचायत आणि विश्व भारती कला क्रीडा संघटनेतर्फे क्रीडा स्पर्धांचे आयोजन

अनेक भागात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. याला स्पर्धकांचा उस्फुर्त सहभाग देखील मिळत असतो. खानापूर तालुक्यातील शिंदोळी ग्राम पंचायत (खानापूर) आणि विश्व भारती कला क्रीडा संघटना, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 19 जानेवारी 2025 रोजी शिंदोळी ग्राम पंचायत प्रांगणात सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पार पडणार आहेत.

या स्पर्धांमध्ये प्राथमिक शाळांपासून ओपन गटापर्यंतच्या स्पर्धकांसाठी धावण्याच्या शर्यती, गोळा फेक, भालाफेक, थाळीफेक, 100 मीटर रिले यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय पारंपरिक खेळांसारख्या विटी-दांडू आणि लगोरीच्या स्पर्धाही होणार आहेत. सीनियर सिटीजनसाठीही विशेष स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत.

सर्व स्पर्धा मोफत असून नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.स्पर्धकांनी स्वतःच्या जबाबदारीवर खेळावे, तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः करून आणावी. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित केले जाईल.असे आयोजाकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश बालकांच्या आणि तरुणांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना देणे आहे. आमची मुलं मजबूत झाली तर राष्ट्र बळकट होईल या विचाराने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन याला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.