स्कॅमरच्या जाळ्यात अडकला , बदनामीकारक आलेल्या धमकीमुळे मंगळवेढा परिसरात एका तरुणाने केली आत्महत्या

अलीकडच्या काळात अनेक गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झालेली आहे. खून, मारामारी, फसवणूक यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. मंगळवेढ्यात एक तरुण स्कॅमरच्या जाळ्यात अडकला आणि बदनामीच्या भीतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम हे खूप लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे स्कॅमर्स त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात.मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता व्हिडिओ कॉल करून यूजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर वापरकर्ता स्कॅमरच्या जाळ्यात अडकला तर त्याचंही खूप नुकसान होतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबर किंवा व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल येत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

मंगळवेढा परिसरात सायबर भामट्यांनी एका तरुणाला लैंगिक शोषणाचा शिकार बनवले. आरोपींनी तरुणाला सेक्सटोर्शन करून ब्लॅकमेल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे.

मंगळवेढा शहर परिसरात एका तरुण मुलाला ऑनलाईन व्हिडीओ कॉल बाहेरच्या राज्यातील एका महिलेने करुन त्याला बाथरुम मध्ये जावून नेकेड होवून व्हिडीओ कॉल करण्याचा सल्ला देवून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडल्याने त्या तरुणास मानसिक धक्का बसून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. दरम्यान बाहेरच्या राज्यातील असे व्हिडीओ कॉल करण्याचा सल्ला कोणी दिल्यास त्यास बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या घटनेची हकीकत अशी, मंगळवेढा परिसरातील एका तरुणाला दि.३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता फेसबुकवर ऑनलाईन नंबरवरुन त्याला व्हिडीओ कॉल करण्याचा सल्ला दिला. सदर महिलेने बाथरुम मध्ये जावून नग्न होवून व्हिडीओ कॉल करावयास सांगितले. मुलाने त्या महिलेचे ऐकून नग्न होवून व्हिडीओ कॉल केला. दरम्यान हे कृत्य सदर महिलेने रेकॉर्डीग करुन त्या तरुणास पैशाची मागणी केली.

अन्यथा तुझ्या नातेवाईकांना हा व्हिडीओ कॉल पाठवून बेइज्जत करण्याचा इशारा दिला. हा मानसिक धक्का त्याला सहन न झाल्याने त्या मुलाने चक्क एका विहिरीत उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला. घरच्यांनी सदर मुलाची वाट पाहून तो न आल्याने पोलीसात मिसींग दाखल केली होती. आत्महत्येनंतर तीन चार दिवसांनी मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगल्याने ही घटना उघड झाली. सध्या व्हॉटसअप, फेसबुकचा जमाना असून प्रत्येक तरुणाच्या हातात मोबाईल दिसून येत आहे. बाहेरच्या राज्यातील स्त्रिया मुलांना आकर्षीत करण्यासाठी असे व्हिडीओ कॉल करुन पैशाची मागणी करतात.

पैसे न दिल्यास पोलीसात तक्रार करण्याची व बदनामी करण्याची धमकी देतात. याला तरुणांनी बळी न पडता अशी धमकी मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.