इचलकरंजी शहरात अनेक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या उत्सवांना नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळतो. इचलकरंजीतील श्री चौंडेश्वरी मंदिरात देखील अनेक विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. सध्या म्हणजेच मंगळवार ७ जानेवारीपासून १३ जानेवारीपर्यंत श्री देवांग समाजाच्यावतीने श्री चौंडेश्वरी मंदिरात श्री बनशंकरी देवीचा उत्सव सप्ताह साजरा होत आहे.
या उत्सव सप्ताहाचा शुभारंभ उद्योगपती अविनाश विठ्ठलराव डाके यांचे हस्ते ध्वजारोहण होऊन ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ झाला. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झाले. या उत्सव सप्ताहामध्ये दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण ह.भ.प. सदाशिवराव उपासे महाराज यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. तसेच ४ ते ६ या वेळेत श्री शाकंभरी श्री बनशंकरी देवीचा उत्सव सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर. देवी महात्म्य वाचन, चौंडेश्वरी कला परिवार यांचे भावगीत भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न होत आहे.
त्याचप्रमाणे सौ. मंदाकिनी तारळेकर यांचे कीर्तन, डॉ. सौ. छाया पाटील, डॉ.सौ.संजिवनी खटावकर, सौ. आशा मेटे व रियाज पठाण यांचे व्याख्यान होणार आहे. उत्सवाच्या प्रमुख दिवशी सोमवार ता. १३ रोजी सकाळी सहा वाजलेपासून महिलांना नदीवेस नाका येथे जाणेसाठी गांधी पुतळा चौकातून गाड्यांची सोय केली आहे. सकाळी सात वाजता मरगुबाई मंदिरापासून गंगाजलकुंभ मिरवणूक निघणार आहे.
मिरवणुकीस जलकुंभ घेऊन येणाऱ्या महिलांना चौंडेश्वरी युवा फौंडेशनच्या वतीने श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्र, नदीवेस नाका येथे चहा व नाष्टाची सोय केली आहे. सदर उत्सव सप्ताहाच्या सर्व कार्यक्रमास सर्वांनी सक्रिय सहभागी होऊन या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवांग समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे व श्री बनशंकरी देवी उत्सव समितीच्या अध्यक्षा श्रीमती माया सातपुते यांनी केले आहे. सदर सप्ताहास चौंडेश्वरी युवा फौंडेशन, चौंडेश्वरी युवती फौंडेशन, चौंडेश्वरी महिला मंडळ व चौंडेश्वरी महिला पतसंस्था यांचे सहकार्य लाभले.