सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत शेतातील एक लाख रुपये किमतीची मक्याची कणसे जळून खाक झाली आहेत हि घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. दत्तात्रय मारुती नरळे (रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला) यांचे लक्ष्मीनगर येथील गट क्रमांक ८३५ मध्ये शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतात अडीच एकरवर मका लागवड केली होती. मका काढणीला आल्याने चार-पाच दिवसांपासून नरळे यांनी मका एकत्र गोळा करून मळणीसाठी ठेवले होते.
त्यांच्या शेतातून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची मुख्य लाईन व सबलाईन गेलेली आहे शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने तार तुटून मका कणसावर पडली व त्याचे आगीत रूपांतर झाले. नरळे कुटुंबीयांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना काही प्रमाणात कणसे बाजूला करण्यात यश आले. मात्र प्रयत्न अपुरे पडल्याने आगीत सुमारे एक लाख रुपये किमतीच्या मक्याची कणसे आगीत जळून खाक झाली. याबाबत दत्तात्रय नरळे यांनी गाव कामगार तलाठी यांना आगीने झालेल्या नुकसानाची माहिती दिली आहे.