आईला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या जन्मदात्या बापाने रागाच्या भरात डोक्यात कुन्हाडीने दोन वेळा घाव घालून पोटच्या मुलाचा खून केला. ही घटना शुक्रवार १० जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास हातीद, ता. सांगोला येथील शिंपे वस्ती शाळेच्या पाठीमागे घडली.रोहिदास रामा पवार (१८) असे मृताचे नाव आहे. याबाबत, बिरा बबन बंडगर (रा. हातीद, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी रामा किसन पवार (हातीद, ता. सांगोला) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता १०३ (१), ३५१ (३) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला.
शिंपीवस्ती येथील समाईक गट नंबर २७७ मध्ये काटेरी झाडे झुडपे तोडून कोळसा तयार करून विकण्याचे आरोपी व त्यांचे कुटुंबिय करीत होते. आरोपी रामा किसन पवार, गौरी रामा पवार व मुलगा रोहिदास रामा पवार हे व्यवसायासाठी हातीद येथे वास्तव्यास आहेत. ते सर्वजण काटेरी बाभळीपासून कोळसा पाडण्याचे काम करतात. शुक्रवार, १० जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रामा पवार व पत्नी गौरी पवार यांच्यात कोणत्यातरी कारणावरून भांडण सुरू होते.
पती रामा हा पत्नी गौरीस शिवीगाळ करून मारहाण करीत होता. त्यावेळी मुलगा रोहिदास याने वडील रामा यांना तुम्ही आईस मारू नका असे म्हणत होता. तरीही वडील रामा हे आई गौरीस मारत होते. तो आई-वडिलांमधील भांडणे सोडविण्यास गेला असता वडील रामा पवार यास मुलाने ढकलून दिले. त्यावेळी रागाच्या भरात वडील रामा पवार याने मुलास, तुला आज जिवंत सोडत नाही असे म्हणून मुलगा रोहिदास याच्या डोक्यात कुऱ्हाडीने दोन वेळा घाव घातले. यामध्ये रोहिदास पवार हा गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला, सहायक पोलीस निरीक्षक सी. पी. पुजारी तपास करीत आहेत.
