सोलापूरचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळतंय. महेश कोठे यांच्या निधनाबद्दल कळताच सोलापूरमध्ये दु:खाचे वातावरण बघायला मिळत आहे. थंडीमध्ये रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्याची माहिती आहे. महेश कोठे हे आपल्या काही मित्रांसोबत कुंभमेळाव्यात सहभागी होण्यासाठी गेले होते.
यादरम्यानच त्यांना हृदयविकाराच्या झटका आला.मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते, नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महेश कोठे हे विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव होते. विष्णुपंत कोठे आणि महेश कोठे हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते.
सोलापूरमधील काँग्रेस मजबूत करण्यासाठी आणि सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्याकरिता कोठे परिवाराची भूमिका अत्यंत महत्वाची होती. कालानंतराने महेश कोठेंनी काँग्रेस पक्षातून शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा प्रवास केला होता. महेश कोठे यांच्या अकाली निधनाने सोलापूर मधील राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी पक्षातुन निवडणूक लढवली होती.