पानपट्टी चालकाला अटक करून लगेच झाली सुटकाही…..

अलीकडच्या काळात गन्हेगारी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने सर्वसामान्य जनतेचे राहणीमान देखील धोक्यात आले आहे. भीतीचे वातावरण आहे. खुलेआम अनेक अवैध्य धंदे अनेक भागात सुरु आहेत. याला तरुणाई बळी पडत आहे. हातकणंगले तालुक्यातील रुई येथील एका पानपट्टीमध्ये नशिल्या गोळ्या विक्री होत असल्याची माहिती गोपनिय खबऱ्या मार्फत पोलिसाना मिळाली. बीट अंमलदार आणि त्यांच्या सहाय्यकाने छापा टाकला. झाडाझडती घेतली.

कांही उत्तेजक पदार्थाचे एक पाकीट गोळ्या त्यांच्याकडे सापडल्या. त्यांची रवानगी थेट पोलीस ठाण्यात झाली. अख्खा दिवस तो पोलिस कोठडी बाहेर ताटकळत राहिला. कुंटुबीयांची धावपळ सुरू होती. पोलीस ठाण्यातील तिसऱ्या डोळ्याची या संपूर्ण प्रकारावर नजर होती. मध्यस्थामार्फत सायंकाळी मांडवली पक्की झाली. कोणताही गुन्हा दाखल होणार नाही यांची खात्री झाली. पानपट्टी चालकाच्या पत्नीने मंगळसूत्र गहाण ठेवले. घरातील इतर सामानाची विक्री केली. शेवटी पोलिसांची बिदागी हातात पडताच पानपट्टी चालकाची सुटका झाली.