सध्या सर्वत्र यात्रांचे दिवस सुरु आहेत. गावोगावी खेड्यापाड्यांत अनेक नियोजनबद्ध कार्यक्रम यात्रेनिमित्त घेण्यात येतात. सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत भाकणुकीला अनन्यसाधारण महत्व आहे. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेत मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू हे परंपरेनुसार भाकणूक सांगतात. सिद्धरामेश्वर यात्रेतील महत्वाचा विधी होम प्रदिपण पार पडल्यानंतर भाकणूक वर्तविली जाते. यंदाच्या वर्षाबद्दल वाससानं केलेल्या भविष्यवाणी बद्दल सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेतील मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी माहिती दिली आहे.
रात्री पावणेबारा वाजता विधी संपन्न
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या महायात्रेतील महत्त्वाचा विधी मंगळवारी रात्री पावणेबारा वाजता संपन्न झाला. गाईच्या वासराकडून भाकणूक विधी दरवर्षी पार पडते.
यंदाच वर्ष कसं राहणार?
2024 लाची परिस्थिती होती, तीच परिस्थिती यंदाच्या वर्षी राहणार अशी भाकणूक करण्यात आली आहे. भाकणुकीसाठी आणण्यात आलेलं वासरू न बिथरता अतिशय शांत उभं असल्याने यंदाच वर्ष हे शांततेच असण्याची भविष्यवाणी मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी केली आहे.
यंदा पिकपाणी कसं असणार
भाकणुकीनुसार वर्षभर पीक, पाऊस स्थिर राहणार असल्याचं ही मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितलं आहे.
वासरू दिवसभर उपाशी
भाकणुकीसाठी देशमुख घराण्याचे मानाच्या गाईचे वासरू दिवसभर उपाशी ठेवलं जातं. भाकणुकीच्या वेळी धान्य, कडधान्य, भाज्या, फळ त्याच्यासमोर मांडून ठेवली जातात. या सर्व पदार्थांना हा वासरू चाटतो की खातो यावरून भाकणूक सांगण्यात येते.
यंदाची पावसाची स्थिती
वासराने मलमूत्र केल्यास भरपूर पावसाची शक्यता वर्तवली जाते मात्र यंदा वासराने मलमूत्र न केल्याने मागच्या वर्षीप्रमाणे पावसाची स्थिती असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
