सुळकूड योजना मार्गी लावण्याची आमदार राहुल आवाडे यांनी केली विधानसभेत मागणी

इचलकरंजीचा प्राणी प्रश्न हा सर्वत्र जग जाहीर आहे. येथील नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत राहते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुळकूडच्या पाणी प्रश्नावरून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली सुळकूड उद्भव असलेल्या दुधगंगा पाणीपुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना केली.

राज्य शासनाने अमृत दोन अभियान अंतर्गत १६० कोटीची सुळकूड उद्भव असलेली दुधगंगा पाणीपुरवठा योजना मंजूर केलेली आहे. पण, नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे योजनेचे काम प्रलंबित राहिले आहे. या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया झाली असून केवळ विरोधामुळे कामाची अंमलबजावणी होत नाही. वस्त्रनगरी इचलकरंजीला मुबलक व स्वच्छ पाण्याची गरज असल्याने सुळकूड योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

वस्त्रनगरी इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून औद्योगिक पसारा वाढत आहे. उदरनिर्वाहाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे याठिकाणी वास्तव्यास आहेत. कष्टकरी कामगारांची संख्या लक्षणीय आहे. औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने सुळकूड योजनेसंदर्भात बैठक घेऊन ही योजना मार्गी लावावी, अशी मागणी आवाडे यांनी विधानसभेत केली.