इचलकरंजी बसस्थानकाचे बदलतयं रूप काँक्रीटीकरणाबरोबर नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

इचलकरंजी मध्यवर्ती एस. टी. बस स्थानकाचे नूतनीकरण व काँक्रीटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच एस. टी. बसस्थानकाचे रुपडे पालटणार आहे. शासकीय निधी आणि महाराष्ट्र औद्योगिक महामंडळामार्फत सुरु असलेले काम महिना – दोन महिन्यात पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नूतनीकरणानंतर वस्त्रनगरीच्या वैभवात भर टाकणारी वास्तू निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील क्रमांक दोनचे एस. टी. बसस्थानक म्हणून इचलकरंजी एस. टी. बसस्थानकाची ओळख आहे. कर्नाटकसह पश्चिम महाराष्ट्राच्या गावांना जोडणारे बसस्थानकामध्ये दररोज शेकडो एस. टी. बसेसच्या फेऱ्या होतात. दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रवाशी संख्या आणि अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे प्रवाशी वर्गाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे सदर एस. टी. बसस्थानकाचे नुतनीकरण व काँक्रीटीकरणाचे काम गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुरु आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने ३ ते साडेतीन कोटी रुपये खर्च करुन बसस्थानकामध्ये काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. प्रवाशीवर्गाला कमीत कमी त्रास होईल त्यापद्धतीने काम सुरु आहे. एस. टी. बसस्थानकामधील एका बाजूचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर एस. टी. बसस्थानकाची रंगरंगोटी, फरशा बसवणे, सिमेंटचे पत्रे काढून कलर कोटेट पत्रे बसवणे, इलेक्ट्रीक ( वायरिंग) आदी कामे शासकीय निधीतून सुरु आहेत. नूतनीकरण कामासाठी सुमारे २ कोटीचा निधी लागणार आहे. बसस्थानक नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून बसस्थानकाच्या दर्शनी बाजूकडे पेव्हींग ब्लॉक व काँक्रीटीकरण तसेच अन्य कामे करण्यात येणार आहेत. सदरची कामे येत्या एक-दोन महिन्यांत पूर्ण होऊन एस. टी. बसस्थानकाचे रुपडे पालटणार आहे.