इचलकरंजी शहरात पाण्याची तीव्र टंचाई ला तोंड द्यावे लागत आहे. वाढती बेरोजगारी, महागाई यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यावरील सूडबुद्धीने सुरू असलेल्या ईडी कारवाईच्या विरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट ) झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आले.
प्रांतिक सदस्य मदन कारंडे, जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे, जिल्हा कार्याध्यक्ष उदयसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यालयापासून घंटानाद करीत मोर्चास प्रारंभ झाला. राज्यात रिक्त असलेल्या सर्व विभागांच्या सर्व संवर्गाची अडीच लाख रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, छुप्या पद्धतीने सुरू असलेली कंत्राटी भरती तत्काळ बंद करावी, आदी मागण्यांचा समावेश निवेदनात आहे. आंदोलनात अभिजित रवंदे, माधुरी सातपुते, प्रिया बेडगे, बानुबी पठाण आदी सहभागी झाले होते.