आगामी दोन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामास लागण्याची गरज आहे. सक्षम कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद असल्याने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप सदस्य नोंदणीचे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष तथा सदस्य नोंदणी अभियानचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असून प्रत्येक कार्यकर्ता या अभियानात सहभागी झाला आहे.
सदस्यता नोंदणी अभियानाच्या धर्तीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यासह जिल्ह्यात महासदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजप सदस्य नोंदणीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे अभियान लाभदायक ठरणार असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत यांनी केले आहे.