शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘देव दिपावली’ उत्साहात!

इचलकरंजी येथील शिवतीर्थ परिसरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने बुधवारी देव दिपावली उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शिवतीर्थ परिसर विविधरंगी आकर्षक रांगोळ्या आणि असंख्य दिव्यांच्या प्रकाशझोतात उजळून निघाला होता.

या महोत्सवाचा असंख्य शिवभक्तांनी आनंद लुटला. हिंदू धर्मात दर्श अमावस्येचा दुसर्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ होतो. या दिवसाला देव दिपावली म्हटले जाते. पुराण शास्त्रानुसार या दिवशी देव-देवतांची दिपावली असते.

याच धर्तीवर इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने देव दिपावली साजरी करण्यात आली. संपूर्ण शिवतीर्थ परिसर विविध रंगांच्या रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. तर तेल वातीच्या असंख्य दिव्यांनी शिवतीर्थ परिसरउजळुन निघाला. त्याला साजेशी विद्युत रोषणाई आणि नयनरम्य आतषबाजीने परिसरात चैतन्यनिर्माण झाले होते.

यावेळी गुरुवर्य गजानन महाजन गुरुजी आणि आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि सौ. निलिमा दिवटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी महाराजांची आरती आणि प्रेरणा मंत्र, ध्येयमंत्राने उत्सवाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी शिवप्रतिष्ठानचे सर्व विभागप्रमुख धारकरी व शिवभक्त उपस्थित होते.