मंगळवेढा तालुक्यात जीवे मारण्याची धमकी देत शेतकऱ्याच्या 2 एकर जमिनीवर कब्जा

दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत चालल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेत असुरक्षिततेची भावना पसरली आहे. वाल्मीक कराडनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याचा कारनामा समोर आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील शेतकरी नवनाथ प्रकाश व्हरे या शेतकऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दोन एकर शेत जमीन खरेदी केल्याचा आरोप व्हरे कुटुंबाने केला आहे.

या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. व्हरे कुटुंबाची गोणेवाडी येथे तीस ते चाळीस एकर शेत जमीन आहे. सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर मासाळ यांनी शेतकरी नवनाथ व्हरे यांना व त्यांचे वडील प्रकाश व्हरे यांना मारहाण करून 16 जानेवारी रोजी दोन एकर शेत जमीन खरेदी केली आहे.

मासाळ यांच्या दहशतीमुळे व्हरे कुटुंब भयभीत झाले असून दहा दिवसांपासून ते घरी देखील गेले नाही. तुझाकडे तीस – चाळीस एकर शेती आहे. तुला कशाला इतकी जमीन पाहिजे. मला तुझी जमीन दे अशी धमकी देऊन माझा मुलगा नवनाथ याला मारहाण करून त्याला जबरदस्तीने उचलून नेऊन जमीन खरेदी करून घेतल्याचा आरोप मुलाचे वडील प्रकाश व्हरे यांनी केला आहे. या सगळ्या प्रकाराची मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावर अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. मायबाप सरकारने आणि अजित पवारांनी न्याय द्यावा, अशी मागणी पीडित व्हरे कुटुंबाने केली आहे.