धक्कादायक! सातवीतील विद्यार्थ्यानं डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य! सोलापूर जिल्हा हादरला

माढा तालुक्यातील आढेगाव येथे सातवीत शिक्षण घेणार्‍या 14 वर्षीय मुलाने अज्ञात कारणाने डोक्यात रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घरी जीवन संपवले. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि.27) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. श्रीधर गणेश नष्टे (वय 14) असे मुलाचे नाव आहे. श्रीधर हा सराटी (ता. इंदापूर) येथील जिजामाता प्रशालेमध्ये सातवीत शिक्षण घेत होता. घटनेदिवशी तो आजारी असल्याने घरीच होता. त्यास दवाखान्यात तपासणी करून आणले होते.

डॉक्टरने त्यास विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्याने अज्ञात कारणाने सोमवारी दुपारी घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत जीवन संपवले. गोळीबाराचा आवाज एकून घरातील आई, आजोबा व इतर धावत आले असता तो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

जीवन संपवण्याचे कारण समजू शकले नाही. श्रीधर याचे वडील राजस्थानमध्ये सीमा सशस्त्र दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याचे समजते. तो आई, लहान भाऊ, आजी, आजोबा यांच्यासमवेत राहत होता. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे या करीत आहेत.