अठरा महिन्यांत २६ लाखांचे आमिष दाखवणाऱ्या वकिलास अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल

अलीकडच्या काळात फसवणुकीच्या घटनात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक फसवणुकीला बळी पडत आहे. ठेव पावत्याच्या माध्‍यमातून १८ महिन्यांत २६ लाख रुपयांचे आमिष दाखविणाऱ्या वकिलाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. भरत श्रीपाल गाट (वय ५२, रा. महावीरनगर, हुपरी, ता. हातकणंगले) त्याचे नाव आहे. निवारा टेस्टामेंटरी ट्रस्टचा तो वकील होता. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, तो स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्यावर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूपुरी पोलिस ठाण्यात मे २०२३ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यावर भरत गाट याने जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.