वडिलांचा अंत्यविधी उरकून परतणाऱ्या लेकालाही मृत्यूने गाठले

सोलापुरात वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना मुलाचाही अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.

करमाळा- कुडुवाडी रस्त्यावरील वरकुटे येथे गुरूवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात इतर चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हर्षद झंकर योगी असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात येथील योगी कुटुंब बंगळुरू येथे गेले होते. काम आटोपून ते पुन्हा आपल्या गुजरातकडे येत असताना योगी यांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. दरम्यान, झंकर यांच्यावर अत्यंसंस्कार करून योगी कुटुंब परत गावी गुजरातकडे निघाले. परंतू, वरकुटे गावाजवळ काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांची गाडीने रस्त्याच्या कडेला असलेला झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातात झंकर यांचा मोठा मुलगा हर्षद यांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.