वाळवा तालुक्यातील मर्दवाडीत अखेर ‘जीबीएस’चा शिरकाव…..

अलीकडच्या काळात अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. नागरिकांचे आरोग्य नवनवीन आजारांमुळे धोक्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रूग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवारी संध्याकाळी पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली.पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या १११ वर पोहोचली आहे. आतापर्यंत केवळ पुण्यात या आजाराचे रुग्ण आढळत होते.

राज्यात विविध भागात वेगाने पसरत असलेल्या गुईलेन बॅरे सिंड्रोम(जीबीएस) या आजाराने सांगली जिल्ह्यातही शिरकाव केला आहे. सांगलीतील चिंतामणीनगर तसेच मर्दवाडी (ता. वाळवा) येथील दोन रुग्ण, तर कोल्हापूर जिल्ह्यातील गुडमुडशिंगी येथील एका रुग्णावर सांगलीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

‘जीबीएस’चे रुग्ण आढळल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. चिंतामणीनगर येथे 400 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. लक्षणे असलेली एकही व्यक्ती आढळली नाही. दरम्यान, नागरिकांनी घाबरू नये, लक्षणे आढळल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी केले आहे.

सांगलीतील चिंतामणीनगर येथील जीबीएस बाधित रुग्ण हा 45 वर्षीय आहे. अजमेर, आग्रा येथून ही व्यक्ती 11 जानेवारीरोजी सांगलीत आली. दोन-तीन दिवसांनी डिसेंट्री, अशक्तपणा जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णाच्या हाताला लुळेपणा येऊ लागताच त्यांना दुसर्‍या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या रुग्णावर व्हेंटीलेटरवर उपचार सुरू आहेत.