टेंभू उपसा जलसिंचन योजना टप्पा क्रमांक सहा याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन नुकतेच पार पडले. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी टेंभू योजनेसाठी खूपच प्रयत्न केले. लोकांनी त्यांना पाणीदार आमदार म्हणून पदवी बहाल केली होती. या टेंभू योजनेचा संपूर्ण गाढा अभ्यास अनिलभाऊ बाबर यांचा होता. टेंभू योजनेच्या पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही हे आमदार अनिल भाऊंचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न साकार होताना ते आपल्या सोबत नाहीत याची खंत देखील प्रत्येकाच्या मनात होती.
या योजनेचे जनक म्हणून दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव घेतले जात होते. टेंभू योजनेच्या भूमिपूजनावेळी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव या टेंभू योजनेला देण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू उपसा जलसिंचन योजनेला दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांचे नाव देण्याचा शब्द दिलेला होता आणि तो त्यांनी पूर्ण केला.
टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित टप्प्यास स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक सहा असे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेला. त्यामुळे या निर्णयाने मतदारसंघातील बाबर कार्यकर्त्यांची इच्छा मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला. यावेळी बाबर समर्थकांनी विट्यात पेढे वाटून फटाके फोडून एकच जल्लोष साजरा केला.