खानापूर तालुक्यातील कार्वे येथील एमडी ड्रग्ज कारखान्याचा प्लॅन ठरला आर्थर रोड जेलमध्ये

अलीकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड वाढ झाल्याचे चित्र दिसतच आहे. अवैध धंदे जोमात सुरु आहेत. नुकतेच अनेक ड्रग्ज प्रकरणे देखील पुढे येऊ लागलेले आहेत. खानापूर तालुक्यातील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एमडी ड्रग्ज बनविण्याचा प्लॅन मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कार्वे-विटामधील एमडी ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकून अटक केलेल्या रहुदीप बोरीचा (रा.उत्तीयादरा, जि. सुरत, गुजरात), सुलेमान जोहर शेख (रा. बांद्रा पश्चिम, मुंबई) व बलराज अमर कातारी (रा. साळशिंगे रस्ता, विटा) या तिघांची मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती.

तेथेच त्यांनी एमडी ड्रग्ज बनवण्याचे ठरवले होते. दोन-तीन वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला होता.

यावेळी एका मोटारीतून एमडी ड्रग्जचा साठा घेऊन चाललेल्या बलराज कातारी याला पकडले. त्यानंतर कारखान्यातील रहुदीप बोरिचा, सुलेमान शेख या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली होती. 29 कोटी 74 लाख रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. विटा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे तपास सोपवला आहे.